Sunday, March 8, 2020

माझे कोकण पर्यटन ( रत्नागिरी ) 🚩 – श्री.सुयोग शहा...

माझे कोकण पर्यटन 🚩– श्री.सुयोग चंदुलाल शहा...🚩
भटकंती चा प्रचंड नाद असल्याने सालाबादप्रमाणे दिवाळी २०१७ मधील फॅमिली ट्रीप मी या वर्षी रत्नागिरी,येथील गणपतीपुळे येथे माझ्या कुटुंबीयां समवेत जाण्याचे नियोजन केले आणि त्याची सुरुवात दिनांक २३/१०/२०१७ रोजी नाशिक येथून प्रवासाला सकाळी ६.०० वाजता सुरुवात केली. सुरुवातीला कोंकणात जावून छान पडी मारायचा प्लॅन होता,पण आपला स्वभाव कुठे स्वस्त बसू देतो का ?
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे वेगळे आहे. 
गणपतीपुळेला जाता - जाता गाडी चालविता चालविता रस्त्यातच विचारांची चक्र गाडीच्या चक्राप्रमाने वेग घेवू लागलीत आणि सुरू झाली विचारांची भटकंती. गणपतीपुळे का पोहोचताच "हॉटेल समीर" चे स्वादिष्ट मासे खावून समुद्रात डुबकी मारून श्री गणेशा केला आणि मग काय फुल टू धमाल मस्ती आणि फोटोग्राफी ( एस.एल.आर ) नव्हे मोबाईल फोटोग्राफी. कधी कधी आणि सध्या जरा जास्तच पण "उद्धव" संचारतो माझ्यात (फोटोग्राफी पुरता मर्यादित ) आणि मी पण जणू काही राजाध्यक्ष यांचा एकमेव वारस असल्या प्रमाणे फोटो काढण्यात मग्न होतो. प्रत्येक क्षण कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करत मला स्वर्गीय सुखाचा अनुभव येत होता. सोबत आमच्या सौ. (आदरार्थी बहुवचन) मैथिली आणि कुमार अद्वैत राजे बरोबर होतेच मधून मधून मला माझ्याच विश्वातून जमिनीवर आणायला. संपूर्ण प्लॅन ठरला कुठे,कधी,कसे,किती वाजता आणि फक्त आणि फक्त मजा केली. संपूर्ण जगाला विसरून कोकणातल्या सर्व छोट्या मोठ्या क्षणांच आनंद घेणे म्हणजे आई शप्पथ सुख असते राव...

दिनांक २४/१०/२०१७ का सुरुवात केली ती
"रत्नदुर्ग भगवतीचा किल्ला" याचे पासून ...

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यां विषयी लहानपणापासून प्रचंड आदर असल्याने त्याविषयी थोडासा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. रत्नदुर्ग भगवतीचा किल्ला हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत सोपा समजला जातो.
रत्नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा "रत्नदुर्ग" हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ साधारणपणे १२० एकर इतके आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.
रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहमनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतीनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरून संपुर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंद्र दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. रत्नागिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नागिरी शहराचा नजारा दीपगृहावरून संध्याकाळी ५:०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.
किल्ल्यावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता असून किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे श्री भागेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या खांबांवर पशूपक्ष्यांची सुंदर सुंदर चित्रे कोरलेली असून मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे.गडावर राहण्याची सोय नाही,जेवणाची सोय नाही पण किल्ला हा हारच भव्य आणि सुरेख आहे. 

दिनांक २५/१०/२०१७ रोजी आम्ही जयगड किल्ला सर करण्याचे योजिले आणि सुरू झाले आमचे मार्गक्रमण...
जयगड किल्ल्याच्या थोडक्यात इतिहास सांगायचं झाला तर -
जयगड किल्ला हा समुद्रसपाटीपासून ३३७६ फूट उंचीवर असलेला हा गड कोयनानगर पासून ११ कि. मी. अंतरावर असलेल्या नवजे गावापासून जवळ आहे. नावाप्रमाणे हिरव्या घनदाट जंगलात वसलेला हा गड निसर्गसंपन्नतेने नटलेला आहे. जंगली जयगडावरुन कोयना धरणाच्या पाणसाठ्याचे दृष्य विलोभनीय दिसते. पश्चिमेकडे चिपळूणच्या दिशेने विस्तीर्ण कोकणाचे दर्शन होते. गडाचा माथा अरुंद व लहानसा आहे. जयगडाच्या बाजूने जंगलात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, रानफुले, वनस्पती आहेत. जयगड किल्ला हा १६०० चे दशकात बिजापूर चे राजे यांनी बांधला होता आणि त्यानंतर तो संगमेश्वर चे नाईक यांचे हाती स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर बिजापूर आणि पोर्तुगाल चे सैन्याचे सन १५८३ ते १५८५ मध्ये पराभव करून सन १७१३ मध्ये जयगड हा बालाजी विश्वनाथ पेशवे यांनी आंग्रे यांना स्वाधीन केला. सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिश सरकार ने काबीज केला.

जयगड किल्ला मार्गक्रमण करून आमची स्वारी निघाली ती जयगड येथील प्रसिद्ध लाईट हाऊस येथे जयगड लाईट हाऊस साधारणपणे १३२ वर्ष जुने असून ते जयगड किल्ल्याचे पश्चीम दिशेला स्थित आहे. लाईट हाऊस बघायची वेळ दुपारी ४-५ असल्याचे आम्हाला लाईट हाऊस येथे ५ वाजून ३ मिन झाल्यावर कळले. पोहोचायला फक्त ३ मिनट उशीर झाला होता आणि लाईट हाऊस बंद करून गडी निघाले होते कुलूप करून. मी खूप खूप विनवण्या केल्या पण गडी एकदम पक्का होतं नाही म्हणजे नाही. अहो आम्ही खूप लांब नाशिक हून आली आहोत,लहान मुलाचा तरी विचार करा पण गड्या ला काही पाझर फुटेना. आमचा अद्वैत चा चेहेरा अतिशय केविलवाणा झला होता, मग काय आपले गांधीजी कधी कामात येणार. साहेब अखेर तयार झालेत आणि त्यांनी आम्हाला लाईट हाऊस दाखवायची परवानगी दिली आणि ती पण लवकर बघण्याची. अतिशय सुंदर असा तो अनुभव होता. लाईट हाऊस च्या वरून समुद्राचा नजारा हा अतिशय विलोभनीय होता.
श्री.जय विनायक मंदिर,जयगड,रत्नागिरी..
जयगड किल्ल्या पासून ६ कि.मी च्या अंतरावर जय विनायक मंदिर हे नव्याने बांधण्यात आलेले गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिराचे बांधकाम हे १० एकर च्या जागेत जिंदाल एनेर्गी लिमिटेड कंपनी च्या वतीने करण्यात आलेली असून त्याची संपूर्ण देखभाल हि देखील जिंदल कंपनी च्या वतीने करण्यात येते. मंदिराच्या परिसरात खूप सुंदर बाग तयार करण्यात आली असून मंदिरचा परिसर हा रात्रीच्या रोषणाई मध्ये अतिशय विलोभनीय व मनमोहक असा दिसतो. जिंदल गणपती म्हणूनच या गणपती ची विशेष ओळख आहे. मंदिराची रचना हि पगोडा पद्धती ने तीन टप्प्यात तयार केली असून गणेशाची मूर्ती हि पंचधातूची असून अत्यंत मनमोहक अशी मूर्ती आहे. स्वर्गीय सुखाचा अनुभव या मंदिरात आल्या शिवाय राहत नाही. आयुष्यात एकदा तरी या मंदिरात दर्शन घेवून आपले आयुष्य सार्थक करावे असे माझे वैयक्तिक मत आहे.
त्यानंतर दिनांक २६/१०/२०१७ रोजी आम्ही सकाळी मालगुंड च्या बीच वर मनसोक्त समुद्रात खेळून झाल्यावर मालगुंड येथील "केशवसुत स्मारक" बघायचे नक्की केले आणि थेट पोचलो ते मालगुंड येथे केशवसुत स्मारक येथे. संपूर्ण नाव "कृष्णाजी केशव दामले" ( केशवसुत) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात. मालगुंड येथे "केशवसुत स्मारक" उभे करण्यात आले असून कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते ०८ मे १९९४ रोजी स्मारकाचे उद्घाटन झाले. 

वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत.
इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मन केशवसुतांकडे जातो. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंतःस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये, असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकुमानुसार नसते, नसावे, हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती. 
प्राचीन कोकण या म्युसियम विषयी रत्नागिरी आणि गणपतीपुळे मध्ये बऱ्याच ठिकाणी जाहिराती पाहून उत्सुकता वाढली होती आणि म आम्ही प्राचीन कोकण बघायला गेलो. ५०० वर्षांपूर्वीचा कोकणचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न या प्राचीन कोंकण चे माध्यमातून करण्यात येतो. कोकणातल्या विविध हस्तकला व स्थानिक वस्तूंची विक्री देखील येथे करण्यात येते.
आम्ही खूप ऐकले होते की थिबा राजवाडा बघा म्हणून गणपतीपुळे पासून २३ की.मी अंतरावर असलेला थिबा राजवाडा बघायला निघालो. थिबा पॅलेस विषयी थोक्यात सांगायचे झाले तर ऐतिहासीक थिबा पॅलेस रत्नागिरी 
शहरातील 'थिबा राजवाडा' ही भव्य ऐतिहासीक वास्तू पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. इंग्रजानी ब्रह्मदेशाच्या थिबा राजाला 1885 साली स्थानबद्ध करुन रत्नागिरीत आणले. त्याच्यासाठी सन 1910 साली हा तीन मजली पॅलेस इंग्रज सरकारने बांधला. या पॅलेसमध्ये थिबा राजा सन 1911 मध्ये राहण्यासाठी गेला. राजवाड्याच्या गच्चीवरून समुद्रकिनाऱ्याचा निसर्गरम्य परिसर दिसतो. मागच्या बाजूस राजाने ब्रह्मदेशातून आणलेली बुद्धाची मुर्ती आहे. याच भागात पुरातन वस्तुसंग्रहालय आहे. तळमजल्यावर प्राचीन मुर्त्या आणि वरच्या मजल्यावरील चित्रप्रदर्शन कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे. थिबा राजवाडा हा आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रम्हदेशच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रह्मदेशच्या राजाची एक वास्तू कधीची पाय रोवून बसली आहे. नाव- थिबा पॅलेस! ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या या राजाला आपल्या आयुष्याची तब्बल तीस वर्षे इथे बंदिवासात काढावी लागली. त्याच्या या वास्तव्यातच त्याने बनवलेल्या या राजवाडय़ात त्याची स्मरणगाथा जागवणारे एक संग्रहालय नुकतेच आकारास आले आहे. थिबाचे हे संग्रहालय पाहण्यापूर्वी त्याचा हा राजवाडाच आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो. २७ एकरांचा हा भव्य परिसर आणि त्याच्या अगदी मधोमध ही उंची वास्तू! कोकणचा जांभा दगड, ब्रह्मदेशचे ‘बर्मा टीक’ लाकूड आणि ब्रिटिशांचे स्थापत्यविशारद यातून ही ब्रह्मदेशी शैलीतील देखणी वास्तू उभी राहिली. दुमजली बांधकाम, त्यावर तिसऱ्या मजल्याची गॅलरी! एकूण चौदा खोल्या आणि दोन मोठाली दालने;
याशिवाय स्वयंपाकघर, स्नानगृह, सज्जे, गच्ची, दादरे यांची रचना, तसेच संपूर्ण इमारतीभोवती कोकणी घरांप्रमाणे उतरत्या छपराचा व्हरांडा! राजवाडय़ाच्या सज्जातून आत शिरताच त्याची भव्यता जाणवू लागते. उंची दालने, त्याला जागोजागी खिडक्या-दारांच्या कमानी. दोन भागातील या इमारतीच्या मधोमध आकाश खुले करणारा मोकळा चौक, पुढे-मागे बागेची रचना, खुल्या चौकात चुन्याच्या निवळीवर चालणारे तत्कालीन कारंजे. असा हा सारा भरजरी बाज आल्याआल्याच त्या राजवाडय़ाची दखल घ्यायला लावतो.
भिंतीतील जागोजागीच्या कमानीच्या खिडक्या तर मोहातच पाडतात. या मोठाल्या खिडक्या आणि मधला मोकळा चौक यामुळे साऱ्या रत्नागिरीत अंगाशी चिकटणारा घाम इथे मात्र वाऱ्यालाही उभा राहत नाही. साऱ्या खोल्या-दालनांमधून हवा-प्रकाश आणि आल्हाददायक गारवाच भरून राहतो. हे सारे अनुभवत गच्चीवर आलो, की तो निळाशार समुद्र आणि नारळी-पोफळीत झाकलेली भाटय़ेची खाडी एकदम नजरेत भरते. दिवसाची ही निसर्गदृश्ये! पण कधी काळी या वाडय़ाला रात्रीचेही सौंदर्य असे. त्या काळी इथे विजेची सोय नव्हती. रात्र झाली की साऱ्या प्रासादातून तेलाचे दिवे उजळले जात; ज्यामुळे या काचेच्या खिडक्यांमधून हा सारा राजप्रासादच उजळलेला भासे. दिवाळीतील दीपोत्सवाने तर साऱ्या महालाचाच ‘आकाश कंदील’ होत असे. मग त्याचे हे सौंदर्य पाहण्यास रत्नागिरीकर इथे पायधूळ झाडत. थिबा पॅलेसच्या या आरसपानी सौंदर्यामुळेच त्याच्यावर मग ‘ग्लास पॅलेस’, ‘कहानी थिबा राजाची’ अशा अनेक कथा-कादंबऱ्याही लिहिल्या गेल्या. असो. थिबाच्या राजवाडय़ाचे हे सौंदर्य पाहतच आपण संग्रहालयात शिरतो. इथे दाराशीच एक बोलका फलक खास कोकणी शैलीत सूचना करत असतो, ‘आपले पाय थिबाच्या राजवाडय़ास लागूद्यात; चप्पल-बूट नकोत!’ कुठलेही संग्रहालय हे मंदिरासारखेच पवित्र स्थळ असते. प्राचीन संस्कृतीची देवता इथे वास करत असते. तेव्हा चप्पल-बुटांचा वापर इथे निषिद्धच! पण आमच्याकडे कुठल्याही शेंदूर फासल्या दगडापुढे चप्पल काढणारी मंडळी इथे मात्र उद्दामपणे चप्पल-बूट घालून वावरतात. या साऱ्यातून आमचा आमच्याच प्राचीन इतिहास-संस्कृतीबाबतचा आदर मात्र स्पष्ट होतो. चार दालनांचे हे संग्रहालय! पैकी पहिली तीन ही प्राचीन कोकणचे दर्शन घडविणारी आहेत. जागोजागी मिळालेली शैलशिल्पं, देवता, मूर्ती, वस्तू, त्याविषयीची छायाचित्रे या दालनांमध्ये मांडली आहेत. प्राचीन वीरगळांचे अनेक नमुने, देवदेवता इथे या शिल्पांतून दिसतात. पण या साऱ्यातही दाराशी असलेले सूर्य आणि भैरवाची पुरुषभर उंचीची सुघड मूर्ती चार क्षण थांबवते. आतील विष्णू, ब्रह्म, धनुर्धारी राम आदींच्या रेखीव मूर्तीही खिळवून ठेवतात. एका दालनात प्राचीन-ऐतिहासिक कोकण दाखवणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंचे चित्रप्रदर्शन आहे; ज्यातून कोकणातील गड-किल्ले, लेणी-मंदिरे अशी अनेक ऐतिहासिक स्मारके या परशूराम भूमीचे दर्शन घडवतात. हे सारे पाहतानाच आपण त्या थिबाच्या दालनापुढे उभे राहतो. राजाच्या दरबाराप्रमाणे हे दालन उंची पडदे, गालिचे, झुंबर आदींनी सजवले आहे. गेल्यागेल्या समोरच एका उंच बैठकीवर लोड-तक्क्य़ांना खेटून राजा थिबाचे ते ऐतिहासिक तैलचित्र मांडलेले आहे. भोवतीने पुन्हा अशीच काही आसने, बैठका. या साऱ्यांवरही राजघराण्यातील तैलचित्रे! ही तैलचित्रे पाहत असताना मधेच थिबाच्या वापरातील खुर्ची, बैठक, काचेची भांडी व अन्य फर्निचर दिसू लागते. यातील बैठका तर उंची कोरीवकाम केलेल्या! भारदस्त वस्तू एखाद्या चिरेबंदी वास्तूत आणखीच भारदस्त वाटू लागतात. 
ब्रिटिशांविरुद्ध लढणारा थिबा रत्नागिरीत तब्बल तीस वर्षे बंदिवासात राहिला. रत्नागिरीचा त्याचा राजवाडाही उपेक्षेचा धनी बनला. १९२६ ते १९६१ रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान, त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन आणि मग बरीच वर्षे एक अनाथ वास्तू अशी या राजवाडय़ाची आणि थिबाच्या इतिहासाची अवस्था होती. तब्बल पाऊणशे वर्षांनंतर १९९४ मध्ये थिबाचे काही वंशज रत्नागिरीचा शोध घेत इथे धडकले आणि झाल्या दर्शनाने पुरते खंतावले! त्यांनी भारत सरकारकडे याबाबत खेद व्यक्त केला. विषय प्रतिष्ठेचा होत सूत्रे वेगाने हलली. थिबाच्या राजवाडय़ाला स्मारकाचा दर्जा प्राप्त झाला. राजवाडय़ाचे जतन सुरू झाले, इतिहास संकलित होऊ लागला. वस्तू गोळा होऊ लागल्या आणि स्मारक संग्रहालयाच्या रुपाने हा राजवाडा पुन्हा ‘थिबाची स्मरणे’ गाऊ लागला!
आरे-वारे हा रत्नागिरीतील सर्वात स्वच्छ आणि निर्मळ असा निळ्या पाण्याचा समुद्र किनारा आहे. रत्नागिरी ते गणपतीपुळे या दरम्यान चे रस्त्या चे एका बाजूला संपूर्ण समुद्र साधारणपणे ७-८ की. मी इतका आहे. या परिसरातून प्रवास करताना प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरता येत नाही. आपण खरंच भारतात आहोत की परदेशातल्या एखाद्या फिल्मी शूट चे लोकेशनला आहोत अगदी असेच वाटते.

भटकन्ती करणे आणि त्या सोबत मनमुराद फोटोग्राफी करणे हे जणू एक प्रकारचे छंद म्हणा किंवा व्यसन आहे आणि असा छंद अथवा चांगले व्यसन असल्याचा मला अभिमान आहे. विशेष करून कोकणातच म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आपल्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो हे माझे स्पष्ट मत आहे. 
माझे कोकणा विषयी चे विशेष प्रेम असण्याचे अनेक कारणांपैकी एक म्हणजे माझी सौभाग्यवती ही देखील कोकणातील पेण येथील असल्याने प्रेरणा ही घरातूनच मिळत असते याची साक्षात अनुभूती येते....

धन्यवाद
श्री.सुयोग चंदुलाल शहा
कोंकण प्रेमी
नाशिक

No comments:

Post a Comment