Friday, June 30, 2023

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे - © सुयोग शहा


या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.  

© सुयोग शहा

जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकात, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.


जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे, जीवनाच अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार असणार. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु: असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.


एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं,

हवं असतं तेच मिळत नसतं,

हवं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं,

चांदण्यांनी भरुनसुध्दा आभाळ आपलं रिकामं असतं.

खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही. सर्व कला, क्रीडा, साहित्य, संगीत, शास्त्री संशोधन हे जीवनाचे विलास आविष्कार आहेत. त्यात जे रस घेतील त्यांना सविकल्प समाधीचे सुख लाभेल. हे सहज सौख्य माणसे विसरतात. खेळीमेळीच्या वातावरणात, विचारांच आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडावेत आणि प्रसंगी काटावेत, पण हा ऐश्र्वर्यछंद रंगपंचमीप्रमाणे सुखद सोहळाच ठरावा. जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहेतिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहेमाणसाने केवळ क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नयेत्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावेलंगडय़ाचा पाय व्हावेअनाथाला पालकसुध्दा व्हावेदुसर्याला आनंद द्यावादुसर्यासाठी जगावेजगू द्यावेजगता जगता जीवनाकडे पाहावेजमेल तेवढे जाणावे या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावेस्वत:ला विसरून अवैयक्तिक पातळीवरुन जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा

माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने राहावे व रमावे. अशा जगण्यात जीवनाचा गौरव आहे. माणसांजवळ विचारशक्ती आहे. आचारशक्ती आहे, सदबुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनब्रह्मचे रूप आपण सतत अनुभवत राहू. निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य, चंद्र यांचे उदात्त, सतत खळखळणारे  लहान मुलांचे हसणे, पायाशी घोटाळणार्‍या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलले की वृध्दांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रुपया हातावर ठेवला तर चार पिढय़ांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थनागीत.. अशा अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन किती विलोभनीय आहे.

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळवा

झिजुनी स्वत: चंदनाने, दुसऱ्यास मधुगंध द्यावा ..

उगवत्या सूर्याला आनंदाचा अर्घ्य दिला की मावळताना तो खूप समाधान देऊन जातो. खरंतर, आनंद हा विनामूल्य मिळतो पण आपल्याला आयुष्यभर त्याचा पत्ताच नसतो. फुलपाखरु प्रत्येक फुलातून मधुकण गोळा करीत असतो तसेच आपण सुद्धा आयुष्यातल्या प्रत्येक कमार्तून आनंद वेचला, प्रत्येक परिस्थिती मध्ये आनंद शोधला चिंता करण्यापेक्षा चिंतन केले म्हणजे आपण आनंदानी भरभरून जावू यात काहीच शंका नाही.


जीवनातील अशा कितीतरी गोष्टी आपल्याला जगण्यासाठी उत्साह देतात. प्रेरणा देतात म्हणूनच आपणही प्रतिभासंपन्न कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुरात सूर मिसळून म्हणूया

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
या ओठांनी चुंबन घ्यावी हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी ..
या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे.

आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याच्या मागे लागले की तो र पळतो व निवांत बसलो की तो अलगद आपल्याखांद्यावर येऊन बसतो. खरंच, आनंदाचं हे असंच असतं. भूतकाळातला मनस्ताप व भविष्यकाळातली चिंता केली की तो भुरकन उडून जातो मात्र वर्तमान काळात राहिले की आपल्या जवळ येऊन बसतो. अमूक एक वस्तू मिळलीकी मी आनंदी होईन या आपल्या सवयीमुळे आपण आयुष्यभर आनंदापासून  वंचित राहतो.  आयुष्यभर आपण आनंदला आपल्यापासून क्षणोक्षणी पुढे ढकलत असतो जसे की शिक्षण पूर्ण झाल्यावर, मनासारखी नोकरी मिळाल्यावर, लग्न झाल्यावर, मुले झाल्यावर, निवृत्त झाल्यावर खूप आनंदानी जगेन; पण आता मात्र खूप पैसा कमावेन या सबबीखाली आपलं संपूर्ण आयुष्यच निघून जातं व आपण जीवन जगण्याच्या शर्यतीत आनंदाला आपल्या सोबत घ्यायचे विसरुनच जातो. म्हणूनच आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात घालवायला पाहिजे. जेव्हा आपण निस्वार्थ प्रेम करतो, अपेक्षारहित जगतो, निष्काम कर्म करतो, ईश्वरीय सानिध्य प्रत्येक गोष्टीत अनुभवतो, समाधानी वृत्ती बाळगतो, प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवतो, इतरांशी अनावश्यक स्पर्धा टाळतो, क्षमाशील असतो व दुसऱ्यांसाठी जगतो तेव्हा आपल्याला जीवनात आनंद मिळत जातो. 

मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया... हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया”....

© सुयोग शहा



Saturday, October 16, 2021

Hatgad Fort 🚩 – Adv. Suyog Shah



ʜᴀᴛɢᴀᴅ ꜰᴏʀᴛ 🚩 

ʜᴀᴛɢᴀᴅ ꜰᴏʀᴛ ( हातगड किल्ला ) ɪꜱ ᴀ ꜰᴏʀᴛ ʟᴏᴄᴀᴛᴇᴅ 71 ᴋᴍ (44 ᴍɪ)ꜰʀᴏᴍ ɴᴀꜱʜɪᴋ, ɴᴀꜱʜɪᴋ ᴅɪꜱᴛʀɪᴄᴛ, ᴏꜰ ᴍᴀʜᴀʀᴀꜱʜᴛʀᴀ. ᴛʜᴇ ʙᴀꜱᴇ ᴠɪʟʟᴀɢᴇ ɪꜱ ʜᴀᴛɢᴀᴅ ᴏɴ ᴛʜᴇ ɴᴀꜱʜɪᴋ-ꜱᴀᴘᴜᴛᴀʀᴀ ʀᴏᴀᴅ. ᴛʜᴇ ɴᴇᴀʀᴇꜱᴛ ᴛᴏᴡɴ ɪꜱ ꜱᴀᴘᴜᴛᴀʀᴀ, ᴡʜɪᴄʜ ɪꜱ 6 ᴋᴍ ꜰʀᴏᴍ ʜᴀᴛɢᴀᴅ ᴠɪʟʟᴀɢᴇ. ɪᴛ ɪꜱ ᴀ ʜɪꜱᴛᴏʀɪᴄ ᴍᴏɴᴜᴍᴇɴᴛ ʟᴏᴄᴀᴛᴇᴅ ɪɴ ᴍᴀʜᴀʀᴀꜱʜᴛʀᴀ, ɪɴᴅɪᴀ, ꜱᴏᴜᴛʜ ᴏꜰ ᴛʜᴇ ʜɪʟʟ ꜱᴛᴀᴛɪᴏɴ ᴏꜰ ꜱᴀᴘᴜᴛᴀʀᴀ ᴀɴᴅ ɴᴇᴀʀ ᴛʜᴇ ʙᴏʀᴅᴇʀ ᴡɪᴛʜ ɢᴜᴊᴀʀᴀᴛ. ɪᴛ ᴡᴀꜱ ʙᴜɪʟᴛ ʙʏ ᴛʜᴇ ᴍᴀʀᴀᴛʜᴀ ᴋɪɴɢ ꜱʜɪᴠᴀᴊɪ ᴀɴᴅ ɪꜱ ʟᴏᴄᴀᴛᴇᴅ ᴀᴛ ᴀɴ ᴇʟᴇᴠᴀᴛɪᴏɴ ᴏꜰ ᴀʙᴏᴜᴛ 3,600 ꜰᴇᴇᴛ. ᴛʜᴇ ᴏɴʟʏ ᴡᴀʏ ᴛᴏ ʀᴇᴀᴄʜ ᴛʜᴇ ꜰᴏʀᴛ ɪꜱ ᴛʜʀᴏᴜɢʜ ᴀ ᴛʀᴇᴋᴋɪɴɢ ʀᴏᴜᴛᴇ ᴠɪᴀ ᴀ ɴᴀʀʀᴏᴡ ʀᴏᴄᴋʏ ᴘᴀᴛʜ. ᴀ ꜱᴛᴀᴛᴜᴇ ᴏꜰ ʟᴏʀᴅ ɢᴀɴᴇꜱʜᴀ ɪꜱ ᴘʟᴀᴄᴇᴅ ᴏɴ ᴛʜᴇ ᴛᴏᴘ ᴏꜰ ᴛʜᴇ ꜰᴏʀᴛ. 🚩

सुरगणा हा नाशिक जिल्ह्यामधील एक तालुका आहे सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळ रांग असे म्हणतात. याच रांगेच्या उपशाखेवर हातगड किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी राजांचा नाशिकचा दख्खनी लढवय्या किल्लेदार गोगाजीराव मोरे यांनी हा हातगड (नासिक) किल्ला राजांना जिंकून दिला.

सुरतकडून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर हा हातगड किल्ला आहे. गुजरातमधील प्रसिद्ध हिलस्टेशन सापुताराकडे जाताना महाराष्ट्राच्या सीमेवर सापुतारापेक्षाही अधिक उंचीचा हातगड आहे. सह्य़ाद्रीतल्या सातमाळा रांगेत काहीसा सुटावलेला हा किल्ला. हे काही संरक्षित जंगल नाही. पण येथे स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काही उपक्रम राबवले जातात आणि पर्यायाने हा परिसर आता पर्यटनाच्या नकाशावर हळूहळू आपले स्थान मिळवत आहे. सुरगाणा तालुक्यातील हे छोटेसे गाव तसे आदिवासीच म्हणावे लागेल.

पायथ्याच्या हातगडवाडीतून चढण्यास सोपा आणि आटोपशीर चढणीचा असा हा किल्ला आहे. १६ व्या शतकात बुरहान निजामशाहने जिंकून घेतलेल्या ५८ किल्ल्यांच्या यादीत याचा हाटका असा उल्लेख असल्याची माहिती मिळते. पेशवाईत हा किल्ला मराठय़ांकडे होता. हातगडवाडी हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले गाव आहे. निसर्गसंपन्न अशा या गावात पेशवेकालीन घोडय़ाच्या पागा तसेच पाण्याचे कुंड पाहावयास मिळतात. या गावातील वनपर्यटनाला चालना मिळण्यासाठी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. येथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते, त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पर्यटकांसाठी निवारा शेड, माहिती केंद्र, रोपवने, विविध पॉइंट मनोरे अशी अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. हातगड किल्ल्यावर जाण्यासाठी हातगडवाडीतून गाडीरस्तादेखील तयार करण्यात आला आहे. वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही उपलब्ध आहे. गाडीरस्ता जिथे संपतो तेथून वर जाण्यासाठी अगदी पंधरा मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे. प्रवेशद्वारावरील शिल्प आणि शिलालेख लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या तटबंदीच्या बाहेर छोटा सपाट भाग आहे. राणीचा बाग म्हणून तो स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे. गंगा-जमुना या बारमाही पाण्याच्या टाक्यांबरोबरच इथे अनेक इतर पाण्याच्या टाक्याही आहेत. धान्य साठविण्याचा एकांडा बुरुज, स्वयंपाकाची वास्तू आणि दारूगोळ्याचे कोठार ही माथ्यावरच आहे. किल्लेदाराचे घर, पेशवेकालीन ध्वजस्तंभ अशा अनेक प्राचीन वास्तू आणि वस्तू तत्कालीन काळाचे दर्शन घडवतात. गडावर किल्लेदार गोगाजीराव मोरे यांची समाधी आहे.

गडमाथ्यावर सहजतने फिरण्यासाठी वन विभागातर्फे दगडी पायऱ्यांचा मार्ग बांधला आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य न्याहाळता येते. सातमाळा रांगेचे आणि साल्हेर या सर्वोच्च गिरिदुर्गाचे दर्शन होते. सापुतारापेक्षा उंच असल्यामुळे सापुताराचा मोहक नजारा दिसतो. नाशिक ते हातगड अंतर ७५ कि.मी. आहे. वणी ते हातगड अंतर ३५ कि.मी.चे आहे. सापुतारा ते हातगड अंतर सहा कि.मी.चे आहे. मुंबईहून हातगड अंतर २४० कि.मी. आहे. हातगडवाडीत अनेक हॉटेल तसेच रिसोर्ट्स राहण्यासाठी उपलब्ध आहेत. हातगड पाहण्यास गेल्यावर सापुतारा, सप्तशृंगी गड, ओझरखेड धरण, चणकापूर धरण, तानापाणी गरम पाण्याचे झरे अशी अनेक ठिकाणे पाहता येतात.

नाशिकहून वणीगावात आल्यावर सप्तश्रृंगीदेवीकडे न जाता सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे. तेथून २० किलोमीटरवर गेल्यावर उजव्या हाताला आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच हातगड. हातगडाचे मूळ नाव हतगरू म्हणजे हद्दीवरचा गड. हा गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. हातगडाच्या अलीकडे महाराष्ट्र तर पलीकडे गुजरात सुरू होते.







हतगडावरून सापुताऱ्याचा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे. हतगडाला हस्तगिरी असेही म्हटले गेले आहे.
बागूल राजांचा कवी रूद राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम या ग्रंथात बागूल राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारर्कीद १३०० ते १७०० अशी आहे. रूद्र कवीने १५९६ मध्ये राष्ट्रौढवंशम् हे महाकाव्य लिहिले. हतगडावरील शके १४६९ (सन१५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यापूर्वी हतगड निजामशाहीत होता. बागूल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला. दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसते. याबाबतही इतिहासात असा उल्लेख मिळतो की, अबकर बादशहाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल्ल याने मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते. तेव्हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला. हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ मध्ये सोन्याचा किल्ला विजय प्रतीकचिन्ह सादर केला. यावेळी बादशहाने हसनअलीला `खान’ ही पदवी देत त्याचे सैन्य वाढविण्यात आले. हतगडचा उल्लेख किल्ल्यातील शिलालेखात हातगा दुर्ग असाही आला आहे. अपभ्रंश होत आलेल्या हतगड किल्ल्याच्या नावाप्रमाणेच हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हतगडवाडीनेही अनेक लढाया सोसल्या आहेत. राजांप्रमाणे सतत बदलत जाणारे गावकरी अन् त्यांच्या जातीधर्मानुसार सण, परंपराही गावाने पाहिल्या आहेत. किल्ल्यावर जाण्यापूर्वी गावाची सफर करताना गावाभाोवती किल्ल्याची तटबंदी मुगलांनी बांधल्याच्या खाणाखुणा पाहायला मिळतात. एक मशीद व पुरातन असे दगडकामात केलेले छोटेखानी तळेही पाहायला मिळते.

गावात प्रवेश करताच एक महादेव मंदिर लागते.. हे पुरातन शिवमंदिर बाराव्या शतकातील होते. याचा नंतर जिर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरावरही एक शिलालेख होता. असे एकूण सहा शिलालेख व सहा ताम्रपट हतगड किल्ल्याचा इतिहास उलगडतात.











महादेव मंदिराच्या जवळच गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख यांची दगडातील बांधणीतील नक्षीकाम केलेली समाधी आहे. ही समाधी कोणाची अन् हतगडच्या इतिहासाशी याचा काय संबंध याची माहिती मनोहर मोरे-देशमुख उलगडन सांगतात. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्यांपैकी एक. दख्खनच्या मोहिमेसाठी त्यांना शके १५८५ (सन १६६३) मध्ये सुरगणा परिसरात पाठविले होते. यावेळी हतगड किल्ला आदिलशाहाचा सुभेदार शुराबखान हा किल्लेदार होता. गोगाजीराव मोरे* यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला शके १५८६ (सन १६६३) मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला आपल्या ताब्यात असणे गरजेचे असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी गोगाजी मोरेंना पाठवून हा किल्ला ताब्यात मिळविल्याचे स्पष्ट होते.
गोगाजीराव मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हतगड परिसरातील बारा गावांची देशमुखी दिली होती.
त्यानंतरच्या उल्लेखानुसार १६८८ मध्ये हसन अलीखानाने हा किल्ला पुन्हा ताब्यात मिळविला. याच दरम्यान, किल्लेदार गोगाजीराव मोरे यांचा मृत्यू झाला असावा, त्यामुळे त्यांची समाधी गावात आहे. गोगाजी मोरे-देशमुख व शिंदे-देशमुखांचे वंशंज दामोदर त्र्यंबक शिंदे-देशमुख यांचे वाडे हतगडाच्या पायथ्याशी होते. त्याचे फक्त अवशेष आता पहायला मिळतात. गावातील किल्ल्याशी संबंधित मोरे, शिंदे हे लोक आता आजूबाजूच्या तालुक्यात, गावांमध्ये विखुरले आहेत. त्यामुळे हतगड आता फक्त आदिवासी समाजच राहत असल्याचे दिसते. गोगाजी मोरे यांचे वशंज मनोहर हनुमंत मोरे-देशमुख सुमारे ४० वर्षांपूर्वी जवळच्या पाळेगावात विस्थापितत झाले. गावात हनुमान मंदिर, महादेव मंदिर व इतरही लहान लहान मंदिरे आहेत. गावात बोहाड्याचा उत्सव केला जातो. शंभर उंबऱ्यांची हतगडवाडी आता आधुनिक रिसॉर्ट संस्कृतीचे रूप धारण करू लागली आहे.






हतगड किल्ला व परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे. हतगडाची सफर आता खूप सोपी झाली आहे. वरपर्यंत गाडीने जाता येते तर गडाच्या पूर्वेकडे नव्याने पायऱ्यांची पायवाट बनविण्यात आली आहे. या पायवाटेने वर गेल्यावर हतगडाच्या पायथ्याशी स्थिरावलेली हतगडवाडी पहायला मिळते अन् पूर्वीचे गाव कसे असेल याची प्रचितीही येते. उभ्या कातळात कोरलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अन् त्यानंतर चार उपप्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करता येतो. मुख्य प्रवेशद्वारावर दोन शिलालेख आहेत. हे दोन्ही शिलालेख देवनागरीत आहे. शिलालेखांची अक्षरे पुसट झाली आहेत. मोहनराव मोरे यांच्या नोंदीत प्रवेशद्वाराच्या पहिल्या शिलालेखावर `श्री प्रतापस्य ही कारकीर्द शेवुजी पंडित यांचे छत्रछायेत आहेत. हिंदू पंडित शेवुजी’ असे तर दुसऱ्या शिललेखात नवीन श्रीपती प्रतापस्य कारकीर्द त्रासजी पंडीत सुत्र सर्व छत्र छायेत’ असे म्हटले आहे. तेथून आत गेल्यावर उजव्या हाताला कातळात कोरलेल्या गुहा आहेत, ही सैन्याचे राहण्याची जागा असावी. थोडे पुढे गेल्यावर डावीकडे सुमारे ४७० वर्षांपूर्वी कोरलेला शिलालेख पहायला मिळतो. या किल्ल्याचे अवशेष काही प्रमाणात सुस्थितीत असल्याने किल्ला भटकायला मजा येते. तटबंदी, पाण्याचे टाके, धान्य कोठार, दरबारी इमारतीचे अवशेष अन् जलव्यवस्थापानाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. येथील एका कबरीच्या समोरील कमानीवरही एक फारसी शिलालेख होता. हा कमान जागेवर नाही. विशेष म्हणजे हतगडाचा नकाशा चक्क ताम्रपटावर काढण्यात आल्याचे मोरे यांच्या संग्रहातील ताम्रपटातून दिसते. हा ताम्रपट हातात घेऊन किल्ला न्याहाळल्यावर तो तसाच असल्याचे लक्षात येते. त्यांच्याकडील एक राजमुद्रा वैशिष्टपूर्ण असून, हतगड ताब्यात घेण्यासाठी छत्रपतीनी ती आदेश स्वरूपात दिल्याचे मोरे सांगतात. एका ताम्रपटावर `शके १५९६ सुबेदार गंगाजी मोरे.दे. ऊर्फ गोगाजी शिंदे अधिकारी चीमनाजी बाबुराव देशपांडे हतगड सदनदाकल देशपांडे प्रा//. मचुकुर हतगड श्रावण शु.पा.’ असे लिहिले आहे. अशा अनेक खाणाखुणांमधून हतगडचा इतिहास समोर येतो. हतगड स्वच्छसुंदर ठेवण्यासाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे. जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच आणि कचऱ्यामुळे हतगड धोक्यात आला आहे. इतिहासात महत्त्वाच्या कामगिरी निभावलेल्या हतगडवाडीच्या सुवर्णमय इतिहासावर संशोधन होण्याची गरज असल्याची साद येथील पाऊलखुणा घालतात.








Hatgad Fort 🚩 – Adv. Suyog Shah - 18/10/2021